नमस्कार शेतकरी मित्रांनो,

        शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राज्य सरकारकडून विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून विविध बाबींसाठी अनुदान दिले जाते. पारंपारिक शेती पद्धतीत शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. वाढती शेतमजुरी, बैलांची कमी होत चाललेली संख्या, वेळेची कमतरता, शेत कामासाठी वेळेवर मजूर उपलब्ध होत नसल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचा यांत्रिकीकरणाकडे कल वाढला आहे.परंतु यंत्र खरेदी करणे प्रत्येक शेतकऱ्याला शक्य होत नसल्यामुळे याच अनुषंगाने राज्य शासनाकडून कृषी यांत्रिकीकरण योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध प्रकारचे यंत्र खरेदीसाठी अनुदान दिले जाते. शेतात यांत्रिकीकरणाचा वापर वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे या उद्देशाने ही योजना राज्यात सुरू करण्यात आली. 

        कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत मळणी यंत्र अनुदान योजना राबविली जाते. मळणी यंत्रामध्ये उफणणी पंखा, बहुपीक मळणी यंत्र, भात मळणी यंत्र, मका सोलणी यंत्र, मळणी यंत्र असे विविध प्रकार आहेत. मळणी यंत्र अनुदान योजनेचे एकूण तीन प्रकारात वर्गीकरण करण्यात आलेले आहे. आणि त्यामध्ये त्याचे उपप्रकार देण्यात आलेले आहे. या योजनेअंतर्गत एकूण तीन प्रकारच्या मळणी यंत्राच्या खरेदीसाठी शासनाकडून अनुदान दिले जाते. यामध्ये 8 बीएचपी पासून 20 बीएचपी पर्यंत क्षमतेचे जे ट्रॅक्टर असतील अशा ट्रॅक्टरचलित अवजारामध्ये सुद्धा मळणी यंत्र आहे. 20 बीएचपी ते 35 बीएचपी क्षमतेच्या ट्रॅक्टरचलित अवजारामध्ये सुद्धा मळणी यंत्राचा समावेश असतो. 35 बीएचपी पेक्षा जास्त क्षमतेच्या ट्रॅक्टरचलित अवजारांमध्ये सुद्धा मळणी यंत्राचा समावेश आहे. मळणीयंत्राच्या उपप्रकारांमध्ये  बहुपीक मळणी यंत्र, 1 टनापासून ते 4 टना पर्यंतच्या प्रति तास क्षमतेचे मळणी यंत्र, 4 टनापेक्षा जास्त प्रतितास क्षमतेचे सुद्धा मळणी यंत्र येतात. या विविध प्रकारच्या मळणी यंत्रासाठी शासनाकडून तीस हजार रुपये पासून अडीच लाख रुपयापर्यंत अनुदान दिले जाते. यामध्ये मळणी यंत्राच्या प्रकारानुसार एक रक्कम निर्धारित करून ठेवण्यात आलेली आहे. ही रक्कम मळणी यंत्राच्या किमतीच्या 50% यामध्ये जी रक्कम कमी असेल ती रक्कम मळणी यंत्रासाठी अनुदान म्हणून दिली जाते.


मळणी यंत्राचे उपप्रकार:

  • बहुपीक मळणी यंत्र 
  • 1 टनापासून ते 4 टनापर्यंत प्रती तास मळणी यंत्र – 1 लाख रुपये अनुदान 
  • 4 टनापेक्षा जास्त प्रती तास क्षमतेचे मळणी यंत्र – 2.50 लाख रुपये अनुदान 

मळणी यंत्र अनुदान योजना 2023 साठी आवश्यक पात्रता:

  • मळणी यंत्र अनुदानासाठी अर्ज करणारे शेतकरी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • शेतकऱ्यांकडे जमिनीचा सातबारा आणि आठ उतारा असणे आवश्यक आहे.
  • शेतकरी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या प्रवर्गातील असल्यास जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत फक्त एकाच यंत्राकरिता अनुदान दिले जाईल. म्हणजे ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार यापैकी  एका बाबीसाठी अनुदान देय राहील.
  • अर्जदाराच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुदानाचा लाभ घेतलेला असल्यास अर्जदाराला ट्रॅक्टरचलित अवजार म्हणजेच मळणी यंत्र अनुदानाचा लाभ देण्यात येईल. त्या संबंधीतअर्जदाराला ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक राहणार आहे.
  • अर्जदाराने एखाद्या घटकासाठी/ अवजारासाठी लाभ घेतला असेल तर पुढील दहा वर्ष त्याच अवजाराकरता अर्ज करता येणार नाही परंतु अर्जदार इतर अवजारांच्या अनुदानासाठी अर्ज करू शकतो. (उदा.  एखाद्या शेतकऱ्याने ट्रॅक्टर या बाबीसाठी चालू वर्षी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत लाभ घेतला असेल. तर त्याला पुढील दहा वर्षाकरिता ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुदान देण्यात येणार नाही. मात्र अर्जदाराला पुढील वर्षी इतर अवजारांसाठी या योजनेअंतर्गत अर्ज करता येईल.)

 

मळणी यंत्र अनुदान योजना 2023 साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे:

  • अर्जदार शेतकऱ्यांचे आधार कार्ड
  • जमिनीचा सातबारा उतारा, 8अ दाखला 
  • जातीचा दाखला (अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती)
  • खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन
  • स्वयंघोषणापत्र
  • पूर्वसंमती पत्र
  • केंद्र शासनाच्या मान्यता प्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल


मळणी यंत्र अनुदान योजना 2023 साठी अर्ज कसा करावा? (How to apply for Malani Yantra Anudan Yojana 2023 Maharashtra):

  • शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत महाडीबीटी वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा असतो.
  • सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी या वेबसाईटला ब्राउझरवर ओपन करा.
  • त्यानंतर अर्जदाराला वापर कर्ता आयडी किंवा आधार क्रमांक टाकून लॉगिन करायचं आहे.
  • लॉगिन केल्यानंतर अर्जदाराला आपले प्रोफाईल 100% भरावे लागेल. 
  • त्यानंतर कृषी विभाग समोरील अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करा.
  • आता कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत असलेल्या बाबी निवडा या ऑप्शनवर क्लिक करा.
  • बाबी निवडा या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर कृषी यांत्रिकीकरण योजनेचा अर्ज ओपन होईल.
  • आता मुख्य घटक यामध्ये कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा ऑप्शन निवडायचा आहे त्यानंतर तपशील यामध्ये ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे हा ऑप्शन निवडावा लागेल. 
  • त्यानंतर मळणी यंत्र अवजारे/ उपकरणे या ऑप्शनमध्ये मळणी यंत्र ही बाब निवडावी लागेल. त्यानंतर एचपी श्रेणी, मशीनचा प्रकार या बाबी निवडाव्या लागतील. बाबी निवडल्यानंतर स्वयंघोषणेवर टिक करावे लागेल. 
  • आता ‘जतन करा’ या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. 
  • यानंतर मुख्यपृष्ठावर येऊन ‘अर्ज सादर करा’ या ऑप्शनवर क्लिक करा. 
  • यानंतर आपण निवडलेल्या बाबी पहा, अनेक बाबी असतील तर त्या बाबींचा प्राधान्यक्रम निवडा. आता योजनेअंतर्गत असलेल्या अटी शर्ती आणि मार्गदर्शक सूचना यावर टिक करून आता अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक करा.
  • आता अर्जदाराला 23.60 रुपये ऑनलाईन पेमेंट करायचे आहे. 
  • अशाप्रकारे मळणी यंत्र योजना 2023 साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
  • त्यानंतर अर्जदाराची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येईल.
  • अर्जदाराला अर्जाची स्थिती महाडीबीटी पोर्टलवर पाहता येईल.